सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेला केंजळगड कातळ्यात खोदलेल्या पायऱ्या, प्राचीन तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकालीन इतिहासामुळे विशेष महत्त्व राखतो. निजामशाही, आदिलशाही आणि इंग्रज काळाची साक्ष देणारा हा किल्ला आजही इतिहासाचा जिवंत वारसा ठरतो.

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये इतिहासाची साक्ष देणारे असंख्य गडकोट विखुरलेले आहेत. काही गडकोट प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आहेत, तर काही गड अल्पपरिचित असूनही आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे इतिहासप्रेमींना भुरळ घालतात. सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेला केंजळगड हा असाच एक ऐतिहासिक किल्ला असून, कातळ्यात खोदलेल्या पायऱ्यांमुळे त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

केंजळगडावर पाऊल ठेवताच इतिहासाचे अनेक थर उलगडताना दिसतात. विस्तीर्ण पठार, कातळात कोरलेल्या पायऱ्या, मजबूत तटबंदी, बुरुज, पाण्याची टाकी, केनजाई देवीचे मंदिर, दगडी घाणे, दारूगोळा कोठडी तसेच भग्नावस्थेतील विविध वास्तूंचे अवशेष आजही या गडावर उभे असून, भूतकाळातील घडामोडींची साक्ष देतात. या अवशेषांमधून केंजळगडाचे सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्टपणे जाणवते.

इतिहासाच्या नोंदी पाहिल्या असता, केंजळगड प्रथम निजामशाहीच्या ताब्यात होता. त्यानंतर १६३६ च्या सुमारास हा किल्ला आदिलशाहीच्या अखत्यारीत गेला. पुढे १६७४ मध्ये आदिलशाहीविरोधात लढा देत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केंजळगड जिंकून हिंदवी स्वराज्यात समाविष्ट केला. मावळ आणि रोहिडा खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत उपयुक्त ठरला होता. कालांतराने भारतात इंग्रज सत्तेचा उदय झाल्यानंतर केंजळगडावरही इंग्रजांनी ताबा मिळवला होता.

केंजळगडाच्या बांधकाम रचनेचा अभ्यास केल्यानंतर काही इतिहास अभ्यासकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, या किल्ल्याचे बांधकाम भोजराजांनी केले असावे किंवा त्यांच्या राजवटीच्या कालखंडात ते उभारले गेले असावे. या किल्ल्याची रचना, स्थान आणि सामरिक महत्त्व यावरून तो केवळ एक संरक्षणात्मक वास्तू नसून, मावळ आणि रोहिडा खोऱ्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणारा केंद्रबिंदू होता, हे अधोरेखित होते.

आजही केंजळगड इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि ट्रेकर्सना आकर्षित करत असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जिवंत प्रतीक म्हणून उभा आहे.

Updated On 29 Dec 2025 12:56 PM IST
Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

PratahkalNewsroom is the editorial team of Pratahkal News, dedicated to delivering accurate, timely, and unbiased news. Our newsroom focuses on verified reporting, in-depth analysis, and responsible journalism across politics, society, economy, and national affairs.

Next Story