AI : हवामानाचा लहरीपणा असो वा पिकांवरील रोग, आता बळीराजाच्या मदतीला धावून आलंय 'एआय' (AI) तंत्रज्ञान! चला तर मग, 'टेक्नोलॉजिया'च्या या भागात उलगडूया शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे अनोखं समीकरण .एक स्मार्ट पर्याय

AI Technology : सध्याच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence - AI) वापर हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. जगभरातील अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या या AI क्षेत्रात अनेक नवनवे शोध लावत आहेत. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगवेगळ्या क्षेत्रात कसा वापर करून घेता येईल या दिशेने अनेक कंपन्या पावले उचलताना दिसत आहेत. याच संदर्भातील इत्यंभूत माहिती आपण टेक्नोलॉजिया या सदरच्या माध्यमातून घेत आहोत. आता पर्यंत आपण AI म्हणजे काय ? त्याचा वेगवेगळ्या स्तरावरील उपयोग , AI च्या माध्यमातून नव्या करियर संधी , AI चा संरक्षण क्षेत्रातील वापार, त्याचा पर्यावरणासाठीचा वापर , त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांसारख्या अनेक गोष्टींसंदर्भात चर्चा केली. 'हरित AI' या सारखी अतिशय महत्वाची संकल्पना आपण या सदरातील लेखांच्या माध्यमातून जाणून घेतली. आता आपण याच कृत्रिम बुद्धिमत्ते (Ai) च्या शेतीतील वापाराबद्धल जाणून घेणार आहोत. चला तर मग Ai च्या विश्वात प्रवेश करूयात .


'कृत्रिम बुद्धिमत्ता' (Artificial Intelligence - AI) या तंत्रज्ञानाने व्हिडिओ, फोटो, कंटेन्ट रायटिंग, आणि इंटेरिअर डिझाइनपासून ते थेट शेतीपर्यंत सर्वच क्षेत्रांत आपली ठळक उपस्थिती नोंदवलेली दिसत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि येथील बहुतांश जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील अचानक येणारे रोग आणि विषाणूंची सर्वाधिक भीती असते. अनेकदा रोगांचे निदान वेळेत न झाल्याने आणि योग्य काळजी न घेतल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत 'एआय' (AI) तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. याच्या मदतीने पिकांवरील रोगांचे वेळीच निदान करणे आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य झाल्यामुळे शेतीची सुरक्षितता वाढते आणि परिणामी उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होते.


सध्याच्या काळात भारतातील हवामान हे सतत बदलताना दिसत आहे, त्यामुळे पावसाचा किंवा हवामानाचा अचूक अंदाज लावणे हे थोडे कठीणच जात आहे . मात्र, 'एआय' आणि 'डेटा ॲनेलिटिक्स ' च्या मदतीने हवामानाचा अंदाज वर्तविण्यापासून ते पिकांना केव्हा आणि किती पाण्याची व खतांची गरज आहे, हे ठरवणे आता सोपे झाले आहे. एआय तंत्रज्ञानामुळे मातीचे विश्लेषण, पाण्याचा योग्य वापर आणि बियाण्यांची निवड यासारखे निर्णय घेणे शेतकऱ्यांना सोपे जाते. विशेषतः 'मशिन लर्निंग' (Machine Learning) अल्गोरिदममुळे मागील डेटाचा अभ्यास करून कृषी क्षेत्रातील निर्णय अचूकपणे घेता येतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट तर वाचतातच शिवाय सिंचन, खते आणि कीटकनाशकांचा वापर स्वयंचलित पद्धतीने (Automatic) झाल्यामुळे संसाधनांची नासाडीही टाळता येते.


शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज अनेक एआय-आधारित टूल्स (Tools) उपलब्ध झाली आहेत. उदाहरणार्थ, 'प्लॅन्टिक्स' (Plantix) हे ॲप मोबाईलवर पिकांचे फोटो स्कॅन करून मातीतील पोषक द्रव्यांची कमतरता आणि रोगांची माहिती देते. 'गमाया' (Gamaya) हे साधन पिकांमधील त्रुटी आणि पोषक द्रव्यांची कमतरता ओळखून फवारणीबाबत सल्ला देते. तसेच, 'एरोबेटिक्स' (Aerobotics) पिकांची सद्यस्थिती ओळखून उत्पन्नाचा अंदाज देते, तर 'ॲगव्हॉइस' (Agvoice) हे साधन जमिनीचे मोजमाप आणि फवारणीच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरते. ही साधने शेतकऱ्यांना कीटकनाशकांचा अतिवापर टाळून योग्य रसायने योग्य प्रमाणात वापरण्यास मार्गदर्शन करतात, ज्यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारते.


अर्थात, भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे कृषी हवामान प्रदेशानुसार बदलते, तिथे AI प्रणीत साहित्य सर्व भागांत एकाच वेळी राबवणे आव्हानात्मक आहे. पूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका आजही कायम असल्याने केवळ तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. तरीही, शेतीमध्ये AI वापर जितका जास्त होईल, तितका तो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास भारतीय शेती अधिक सुरक्षित, सोपी आणि भरघोस उत्पन्न देणारी होऊ शकते, यात शंकाच नाही. आता याच AI प्रणालीचा वापर करून अनेक उत्पादने मिळवणे सोप्पे झाले आहे . या संदर्भात आपण अधिक माहिती नक्कीच पाहूयात परंतु पुढील लेख मालिकेत. आपण आजच्या या भागात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेती यांचा संबंध कसा आहे याची तोंड ओळख करून घेतली आहे पुढील लेखात या विषयी सविस्तर जाणून घेऊ . तूर्तास धन्यवाद !

Updated On 25 Dec 2025 9:49 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story