आकाशात झेपावणं, पक्ष्यांसारखं हवेत तरंगणं – ही कल्पना आता स्वप्नातली नाही, तर वास्तवातली मजा बनली आहे. साहसी खेळांच्या यादीत आता लोकप्रिय होत असलेलं नाव म्हणजे Zip Lining! हवेशी स्पर्धा करत, उंचावरून खाली झेपावण्याचा हा अनुभव आज तरुणाईला वेड लावत आहे. भारतातही लोणावळा, ऋषिकेश, गोवा अशा अनेक ठिकाणी Zip Liningचे केंद्र उघडली गेली आहेत. मग निसर्गाच्या कुशीत थराराचा अनुभव घ्यायला तयार आहात का तुम्ही?


पंछी बनु उडती फिरू - zip lining
- विनश्री राणे
आकाशात पक्ष्यांसारखं मुक्तपणे उडणं, वाऱ्याशी गप्पा मारत स्वच्छंद विहार करणं, ही माणसाची एक आदिम इच्छा आहे. कदाचित याच तीव्र इच्छेतून विमानाचा शोध लागला असावा. तुम्हालाही जर जमिनीला सोडून काही क्षणांसाठी हवेत उडण्याचा आणि निसर्गाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर झिप लाइनिंग (Zip Lining) हा साहसी खेळ खास तुमच्यासाठीच आहे. निसर्गाच्या सान्निध्यात घेतला जाणारा हा एक अनोखा आणि रोमांचक खेळ आहे.

हवेशी मैत्री करणारा खेळ; Zip Liningचा वाढता क्रेझ
Zip Lining म्हणजे काय ?
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध भूतकाळात वेगळ्या कारणांसाठी लागला होता, पण आज आपण त्या पूर्णपणे वेगळ्या प्रकारे वापरतो. झिप लाइनिंग हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. या तंत्राची सुरुवात दुर्गम भागांतील नदी-नाले किंवा खोल दऱ्या सुखरूप पार करण्यासाठी झाली होती. म्हणजेच, एके काळी लोकांचा जीव वाचवणारी ही पद्धत आज जगभरात एक प्रचलित साहसी खेळ म्हणून ओळखली जाते.
यामागेही आहे विज्ञान !
तसं पाहिलं, तर या खेळासाठी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आभार मानले पाहिजेत. यामध्ये दोन उंच टोकांमध्ये एक मजबूत केबल तार बांधलेली असते आणि त्या तारेला धरून वेगाने एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जायचे असते. तुम्ही म्हणाल, "यात विज्ञान कोठे आले?"

हवेशी मैत्री करणारा खेळ; Zip Liningचा वाढता क्रेझ
तर मित्रांनो, नीट निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की ती केबल तार सरळ न बांधता मुद्दाम तिरकी बांधली जाते. यामागचे कारण म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम. या तिरप्या रचनेमुळे, व्यक्ती कोणत्याही बाह्य ऊर्जेशिवाय केवळ गुरुत्वाकर्षणामुळे सहजपणे खाली घसरत येते आणि मध्येच अडकून राहण्याची शक्यता कमी होते. इतकेच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या केबलवरून घसरण्याचा वेगही कमी-जास्त करता येतो, ज्यामुळे हा खेळ अधिक सुरक्षित बनतो.

हवेशी मैत्री करणारा खेळ; Zip Liningचा वाढता क्रेझ
कसा असतो हा अनुभव ?
झिप लाइनिंग सुरू करण्यापूर्वी, इतर साहसी खेळांप्रमाणेच तुमची शारीरिक क्षमता तपासली जाते. त्यानंतर, अनुभवी प्रशिक्षकांकडून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात. एखाद्या योद्ध्याप्रमाणे तुम्हाला हेल्मेट, हार्नेस आणि आवश्यक असल्यास लाइफ जॅकेट घालून सज्ज केले जाते.
आणि मग, "चला, भरारी घेऊया!" म्हणत तुमचा साहसी प्रवास सुरू होतो. सर्रकन त्या केबलवरून घसरत असताना, आपण एखाद्या सुपरहिरोप्रमाणे हवेत तरंगत असतो. आजूबाजूचा निसर्गरम्य देखावा, चेहऱ्यावर आदळणारी थंडगार हवा आणि त्या उंचीवरून दिसणारे विहंगम दृश्य... हे सर्व अनुभव अंगावर रोमांच उभे करतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, "खाली पाहण्यास मनाई आहे!" कारण साधारणतः ५० ते १५० फूट उंचीवरून झिप लाइनिंग केली जाते.

हवेशी मैत्री करणारा खेळ; Zip Liningचा वाढता क्रेझ
उंचीची भीती वाटते ? मग हा उत्तम पर्याय !
ज्यांना बंजी जंपिंग (Bungee Jumping) किंवा स्कायडायव्हिंग (Skydiving) यांसारख्या अतिउंचीच्या साहसी खेळांची भीती वाटते, त्यांच्यासाठी झिप लाइनिंग हा एक तुलनेने सोपा, उत्तम आणि अत्यंत सुरक्षित पर्याय आहे.
भारतातील प्रमुख झिप लाइनिंग स्थळे :
  • लोणावळा (महाराष्ट्र)
  • सापुतारा (गुजरात)
  • ऋषिकेश (उत्तराखंड)
  • गोवा
  • मसुरी (उत्तराखंड)
  • मनाली (हिमाचल प्रदेश)
  • कोड़ाईकॅनाल (तमिळनाडू)

हवेशी मैत्री करणारा खेळ; Zip Liningचा वाढता क्रेझ
झिप लाइनिंग करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :
  • नेहमी अधिकृत आणि प्रमाणित झिप लाइनिंग केंद्राचीच निवड करा.
  • प्रशिक्षकांच्या सूचना आणि मार्गदर्शनाचे काळजीपूर्वक पालन करा.
  • हार्नेस, हेल्मेट इत्यादी सुरक्षा उपकरणे नीट बांधली आहेत की नाही, याची पुन्हा एकदा खात्री करा.
  • तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास, खेळात सहभागी होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
थोडक्यात, झिप लाइनिंग म्हणजे केवळ साहस नाही, तर तो एक स्वातंत्र्याचा, हवेशी मैत्री करण्याचा आणि स्वतःच्या भीतीवर मात करण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे. पक्ष्यांसारखं उडण्याचं तुमचंही स्वप्न असेल, तर एकदा तरी झिप लाइनिंग नक्की करून पाहा!
हे ही वाचा :
Editorial

Editorial

Next Story