मंडळी, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स म्हटलं की डोळ्यासमोर स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग किंवा रिव्हर राफ्टिंग येतं. पण आता चर्चेत आहे एक भन्नाट खेळ – झोर्बिंग! प्रचंड पारदर्शक बॉलच्या आत बसायचं आणि डोंगरउतारावरून गोल गोल फिरत खाली यायचं. ऐकायला वेडंवाकडं वाटतंय ना? पण हाच खेळ जगभरात लोकप्रिय होत चाललाय. भारतातही मनालीपासून लोणावळ्यापर्यंत झोर्बिंगची क्रेझ वाढतेय. जोखीम कमी, मजा दुप्पट – म्हणूनच हा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट तरुणाईच्या यादीत टॉपवर पोहोचतोय!


बॉलमध्ये बसून अ‍ॅडव्हेंचरचा मजेशीर प्रवास म्हणजे
विनश्री राणे
मंडळी, मित्रांसोबत असताना आपण खूप मजामस्ती करतो, नाही का? कधी भन्नाट आयडिया सुचते, तर कधी थोडीशी वेडेपणाची! पण आज मी तुम्हाला एका अशा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टबद्दल सांगणार आहे, ज्याचा जन्मच दोन मित्रांच्या भन्नाट कल्पनेतून झाला आहे – झोर्बिंग!
आतापर्यंतच्या “अ‍ॅडव्हेंचर अड्डा”च्या लेखांमध्ये आपण वेगवेगळे रोमांचक खेळ पाहिले. पण आजचा खेळ जरा हटके आहे. विचार करा – एक प्रचंड पारदर्शक बॉल आणि त्याच्या आत तुम्ही! आणि मग तो बॉल डोंगराच्या उतारावरून गोल गोल फिरत खाली येतो… हे ऐकून तुम्हाला विचित्र, कदाचित विनोदीही वाटेल, अलीकडे हीच गोष्ट अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट म्हणून प्रसिद्ध होत आहे. आधी तर आपण झोर्बिंग म्हणजे काय आणि ते नेमकं कस करतात हे जाणून घेऊया.
तर मित्रांनो झोर्बिंग म्हणजे एका मोठ्या पारदर्शी प्लास्टिकच्या चेंडूंमध्ये बसायचं आणि डोंगरउतारावरून अक्षरश लोळत, धडपडत खाली यायचं.. ह्या चेंडूला Zorb Ball म्हणतात. काही ठिकाणी तुम्ही पाण्यावर तरंगत झोर्बिंग करू शकता, तर काही ठिकाणी बर्फावरून घसरत! या खेळाची गम्मत म्हणजे यात आपल्याला काही करावं लागतच नाही. आपण फक्त बॉलमध्ये बसायचं आणि बाकी सगळी धमाल आपोआप होते! कोणतीही मेहनत न घेता अगदी सहज आपलं डोकं खाली आणि पाय वर. अर्थातच यात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची संपूर्ण काळजी घेतली जाते.
बॉलमध्ये बसून अ‍ॅडव्हेंचरचा मजेशीर प्रवास म्हणजे
मोठ्या गोलाच्या आत एक लहान गोल असतो ज्यात पर्यटकांना बसवलं जात त्यामुळे अपघाताची शक्यता अगदीच कमी होते. तुमच्या मनात कदाचित प्रश्न आला असेल की ह्यात काय अ‍ॅडव्हेंचर आहे? आणि लोकं का पैसे खर्च करतात ह्यासाठी?
तर मित्रांनो मला असं वाटत की आपल्या सगळ्यांमध्येच काहीतरी वेगळं करायचंय ही इच्छा दडलेली असते. जी कळत नकळत बाहेर पडते. ह्याचसाठी अनेक लोकं झोर्बिंग करून पाहतात. दुसरं म्हणजे आपल्या शरीर आणि मनाला पूर्ण मोकळं करत, कोणतीही गोष्ट कंट्रोल करायचा प्रयत्न न करता, फक्त त्या क्षणात जगायला आपल्याला झोर्बिंग शिकवते आणि म्हणून ती लोकांना आवडते.
बॉलमध्ये बसून अ‍ॅडव्हेंचरचा मजेशीर प्रवास म्हणजे
न्यूझीलंड ही जन्मभूमी असलेल्या या खेळची लोकप्रियता दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसते. भारतात मनाली, पहलगाम, दिल्ली अगदी महाराष्ट्रातल्या लोणावळ्यातही झोर्बिंग सेन्टर्स सुरु झालेले आपल्याला दिसतात. खूप रिस्क न घेता ज्यांना अ‍ॅडव्हेंचर करायचं असेल त्यांच्यासाठी हा खेळ अगदी परफेक्ट आहे.
मग वाट कसली पाहताय? तुमच्या जवळचं सेंटर शोधा आणि अनुभव घ्या या भन्नाट अ‍ॅडव्हेंचरचा!
Editorial

Editorial

Next Story