डोंगराच्या टोकावर उभं राहिल्यावर, नजरेसमोर पसरलेलं पांढरं शुभ्र साम्राज्य… हातात स्की पोल्स, पायात स्कीज आणि हृदयात धडधडता उत्साह. एका ढकलण्यावर सुरू होते वाऱ्याशी स्पर्धा आणि बर्फाशी मैत्री! स्कीइंग ही केवळ एक खेळाची संकल्पना नाही, तर साहस, सौंदर्य आणि आत्मविश्वास यांचं परिपूर्ण मिश्रण आहे. चला तर मग, आज आपण पाऊल टाकूया या रोमांचक बर्फील्या दुनियेत!


थंडीच्या कुशीतलं उबदार साहस म्हणजे
- विनश्री राणे
"पायाखालची जमीन सरकली" हा वाक्प्रचार आपण कित्येकदा ऐकतो. पण जर खरंच पायाखालची जमीन, तीही पांढऱ्या शुभ्र बर्फाची, वेगाने घसरायला लागली तर? हाच अनुभव म्हणजे स्कीइंग!
मित्रांनो,अ‍ॅडव्हेंचर अड्डा मालिकेत आजवर आपण पाण्यातले, हवेतले, डोंगरांवरचे असे अनेक साहसी खेळ पाहिले.पण आज आपण पोहोचलो आहोत बर्फाच्या जगात, जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि रोमांच दोन्ही एक होऊन जातं.
डोंगर उतारावर, पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या गालिच्यावर सुंदर नक्षी उमटवत, झर झर खाली येणारे स्कीअर्स…हे दृश्य आतापर्यंत आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिलंच असेल. पण मित्रांनो, जितका सोपा हा खेळ दिसतो तितका तो सोपा नाहीये बरं.

बर्फावरची शर्यत – स्कीइंगचा थरार!
हातात स्की पोल्स(हातातील काठी) घेत, एक हलकंसं पुढे झुकणं… आणि मग सुरू होते वाऱ्याशी शर्यत! ४० ते १०० किमी प्रतितास वेगाने उतरताना चेहऱ्यावर झोंबणारी थंड हवा, मध्येच येणारे उंचवटे-खड्डे आणि नागमोडी वळणं, तर संतुलन टिकवण्यासाठी लागणारी कसोटी — हीच तर आहे स्कीइंगची खरी मजा.

बर्फावरची शर्यत – स्कीइंगचा थरार!
बर्फावरून सहज घसरता यावं यासाठी आपल्या पायाला दोन पट्ट्या बांधल्या जातात ज्यांना स्कीज (लांब फळ्या) म्हणतात. सुरक्षेसाठी योग्य प्रकारचे कपडे, हेल्मेट आणि स्की गॉगल्स आपल्याला दिले जातात. आपल्या वजनाचा भार सांभाळत, तोल सांभाळत डोंगराच्या सरळ उतारावरून स्कीइंग करणं सुरुवातीला थोडं कठीण जातं. पण एकदा का सरावाने हे सगळं जमलं की मिळणारा आनंद शब्दांच्या पलीकडचा असतो.
त्या बर्फाच्या शुभ्र उतारावरून खाली आल्यानंतर मागे वळून आपल्या पाऊलखुणा पाहणे म्हणजे एक वेगळाच, अविस्मरणीय अनुभव. स्कीइंग मध्येही वेगवेगळे प्रकार असतात आणि बर्फात खेळल्या जाणाऱ्या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स पैकी हा सगळ्यात लोकप्रिय असा खेळ आहे.

बर्फावरची शर्यत – स्कीइंगचा थरार!
भारतातही स्कीइंग साठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत, जसं की जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग, हिमाचल प्रदेशातील मनाली आणि उत्तराखंडमधील औली. हिवाळ्यात बर्फवृष्टी झाल्यावर ही ठिकाणं स्कीइंग शौकिनांसाठी नंदनवन बनतात. या खेळाचा थरार अनुभवण्यासाठी परदेशी जाण्याची गरज नाही.
आयुष्यात काहीतरी वेगळं आणि अविस्मरणीय करायचं असेल, तर स्कीइंग नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असावाच. हा केवळ एक खेळ नाही, तर तो आपल्या क्षमतांना आव्हान देण्याचा, निसर्गाच्या जवळ जाण्याचा आणि स्वतःमधील आत्मविश्वास वाढवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. तर मग, कधीतरी स्कीज बांधून बर्फावर स्वार होण्याचा विचार नक्की करा!
हे ही वाचा :
Editorial

Editorial

Next Story