स्वतःशी नव्याने ओळख घालून देणारी ‘ती’ ; बंजी जम्पिंग
भीतीवर मात करून स्वतःला नव्याने ओळख देणाऱ्या धाडसी तरुणाईसाठी आता साहसाच्या कळसाचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. शेकडो फूट उंचीवरून उडी मारत – केवळ दोरीच्या आधारावर हवेत लटकण्याचं धाडस… हे म्हणजेच बंजी जम्पिंग! भारतातही आता या साहसी खेळाचा क्रेझ झपाट्यानं वाढतोय. विशेषतः तरुण पिढी आपल्या मर्यादांचा कस घेत, या थरारक अनुभवात स्वतःला झोकून देताना दिसतेय. पण हा थरार अनुभवताना सुरक्षा आणि मानसिक तयारी यांचीही तितकीच गरज आहे. बघूया नेमकं काय असतं बंजी जम्पिंग आणि कसं घ्यावं या अनुभवाचा ‘उड्डाण’ भरलेला आनंद…
_202507301614155443.jpg)
_202507301614155443.jpg)
आज लेख लिहायला घेतला आणि लहानपणीची एक मजेशीर आठवण आठवली. त्या आठवणीने चेहऱ्यावर आपसूक हसू आलं. लहानपणी जेव्हा एखादा मित्र काहीतरी धाडसी करत असे, आपणही त्याच्या मागे लागायचो आणि मग घरी आईचा चांगलाच धपाटा बसायचा. त्यात आईचा ठरलेला डायलॉग – “मित्राने आगीत उडी मारली तर तू पण मारशील?” हा कायम आठवतो. गंमत म्हणजे आता तेच मित्र एकत्र येऊन शेकडो फूट उंचीवरून "उड्या" मारतात आणि ते पण स्वतःच्या इच्छा आणि आवडीने – adventure च्या नावाखाली!
_202507301619419549.jpg)
मित्रांनो, आतापर्यंत adventure अड्डा या मालिकेत आपण विविध साहसी खेळांचा अनुभव घेतला. आज आपण ज्या खेळाबद्दल बोलणार आहोत, त्याचा उल्लेख शीर्षकातच झाला आहे – बंजी जम्पिंग. एकदा मी याचा व्हिडिओ पाहिला होता. एखाद्याने शेकडो फूट उंचीवरून उडी मारलेली पाहून माझं काळीजच क्षणभर थांबलं. मनात अनेक प्रश्न तयार झाले – ही उडी खरंच सुरक्षित आहे का? लोक हे असं का करतात? त्यातला thrill तरी काय आहे?
हे प्रश्न मनात येणं स्वाभाविकच आहे. पण याच शोधातून बंजी जम्पिंगबद्दल खूप माहिती मिळाली. या खेळाची सुरुवात 1980 च्या सुमारास झाली असं मानलं जातं. या खेळात सहभागी होणारा व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणाहून – जसं की पूल, टॉवर किंवा खडकाळ डोंगरावरून – उडी घेतो आणि त्याच्या पायाला बांधलेली विशेष प्रकारची लवचिक दोरी, म्हणजेच ‘बंजी’, त्याला खाली आदळू न देता योग्य वेळी थांबवते. या दोरीमुळेच या खेळाला ‘बंजी जम्पिंग’ असं नाव मिळालं.
_202507301625252699.jpg)
आजकाल आपल्यापैकी अनेकांना आपल्या रोजच्या साचेबद्ध जीवनातून बाहेर पडून काहीतरी वेगळं आणि थरारक करायची इच्छा असते. साहसी खेळ हे त्या इच्छेचं उत्तम माध्यम ठरतात. बंजी जम्पिंग करताना सुरुवातीला मनात थोडी भीती असते, पाय मागे हटायला लागतात, पण जेव्हा एकदा उडी घेतली जाते – त्या काही सेकंदांत एक भन्नाट अनुभव मिळतो. शरीराला स्पर्शणारी गार हवा, खाली दिसणारा निसर्ग, आणि सगळं काही क्षणात बदलून जातं. त्या क्षणी मिळणारा आनंद केवळ वातावरणाचा नसतो, तर तुमच्या भीतीवर तुम्ही केलेल्या विजयाचा असतो. ती उडी म्हणजे तुमच्या आतल्या धाडसी, स्वतंत्र आणि थोड्याशा वेड्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते.
_202507301638139184.jpg)
भारतामध्ये आता अनेक ठिकाणी बंजी जम्पिंग सेंटर्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात लोणावळा, गोवा, तसेच देशातील सर्वात उंच बंजी जम्पिंग पॉईंट ऋषिकेशमध्ये आहे. बंगलोरमध्येही उत्तम सुविधा आहेत. पण हे करताना काही गोष्टींची खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं असतं. नेहमी सरकारमान्य, अनुभवी संस्था निवडा. तुमचं इक्विपमेंट – हेल्मेट, सेफ्टी हार्नेस – नीट तपासलं जातं का हे पाहा. मानसिक तयारी ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. मनात थोडीफार भीती असणं स्वाभाविक असलं तरी ती पूर्णपणे नियंत्रणात असेल याची खात्री असली पाहिजे. काही शारीरिक आजार असतील, तर तिथे सांगून मगच निर्णय घ्या. बंजी जम्पिंग म्हणजे केवळ एक साहस नसून, स्वतःला पुन्हा नव्याने भेटण्याचा एक मार्ग आहे. आपण काय करू शकतो, आपल्यात किती सामर्थ्य आहे, हे स्वतःलाच दाखवून देण्याची एक विलक्षण संधी.
काय मग, तुम्ही कधी जाताय बंजी जम्पिंग करायला?

