प्रवाहासोबत चालण्याचा थरार म्हणजेच 'वॉटर ट्रेकिंग'
नेहमीच्या ट्रेकिंगमध्ये वाटेत येणारा ओढा किंवा नदीचं पात्र आपण पार करतोच, पण जेव्हा ट्रेकिंगचा संपूर्ण मार्गच लहानमोठ्या नद्यांनी, नाल्यांनी, प्रवाहांनी आणि धबधब्यांनी भरलेला असतो, तेव्हा त्याला वॉटर ट्रेकिंग म्हणतात.

विनाश्री राणे .
ट्रेकिंग म्हटलं की साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात डोंगरदऱ्या, जंगल, उंच सुळके आणि पायवाटा. पण वॉटर ट्रेकिंग म्हणजे या साहसाच्या जगात पडलेली एक खास भरच! नेहमीच्या ट्रेकिंगमध्ये वाटेत येणारा ओढा किंवा नदीचं पात्र आपण पार करतोच, पण जेव्हा ट्रेकिंगचा संपूर्ण मार्गच लहानमोठ्या नद्यांनी, नाल्यांनी, प्रवाहांनी आणि धबधब्यांनी भरलेला असतो, तेव्हा त्याला वॉटर ट्रेकिंग म्हणतात. ही एक प्रकारे ट्रेकिंगचीच सख्खी बहीण आहे, पण रंग-रूपाने आणि स्वभावाने थोडी वेगळी. यात कधी ओढे पार करावे लागतात, कधी गुळगुळीत दगडांवरून सावधपणे खाली उतरावं लागतं, तर काही ठिकाणी प्रवाहातून जाण्यासाठी थोडंसं पोहावं देखील लागतं. थोडक्यात सांगायचं तर, ट्रेकिंग, स्विमिंग आणि क्लाइंबिंग या तिन्हीचा अनुभव देणारं एक रोमांचक मिश्रण म्हणजे वॉटर ट्रेकिंग.
डोंगरदऱ्यांतील खडकाळ वाटांसोबतच पाण्यातील गुळगुळीत आणि निसरड्या वाटाही यामुळे आपल्याला अधिक आपल्याशा वाटू लागतात. पावसाळा हा वॉटर ट्रेकिंगसाठी उत्तम काळ असतो. या काळात ओढ्यांना आणि नद्यांना खळखळत पाणी वाहत असतं, पावसाने माती ओलीचिंब भिजलेली असते आणि झाडांच्या पानांवरील पाण्याचे थेंब हळूच गळत असतात. या वातावरणात मध्येच पाऊस आपल्याला छान न्हाऊ घालतो, ज्यामुळे निसर्गाचा आगळावेगळा वर्षासोहळा अगदी जवळून अनुभवता येतो. मात्र, हा थरार अनुभवताना काही काळजी घेणे आवश्यक आहे, कारण वॉटर ट्रेकिंग हे सामान्य ट्रेकिंगपेक्षा अधिक आव्हानात्मक असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ट्रेक रूट आणि परिस्थितीची पूर्ण माहिती असलेला ट्रेक लीडर किंवा गाईड सोबत असणं गरजेचं आहे. याशिवाय, कपडे सैलसर आणि ट्रेकसाठी योग्य असावेत आणि शूजची ग्रीप चांगली असायला हवी, कारण या मार्गावर अनेकदा निसरड्या आणि गुळगुळीत वाटांवरून चालावं लागतं.
भारतात अनेक ठिकाणी तुम्ही या साहसी खेळाचा आनंद घेऊ शकता. महाराष्ट्रात संधान व्हॅली, देवकुंड, भिवपुरी, अंधारबन यांसारखी ठिकाणं वॉटर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच मेघालय, तामिळनाडू, उत्तराखंड इथेही अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे या रोमांचक प्रवासाचा अनुभव घेता येतो. कधी प्रवाहासोबत चालताना, तर कधी प्रवाहाविरुद्ध मार्ग काढताना निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. या पावसाळ्यात तुम्ही वॉटर ट्रेकिंगला जाऊ शकला नसाल तरी, पुढच्या पावसाळ्यात याचा प्लॅन नक्की करा. कारण, निसर्गाचा हा उत्सव तुमच्या आठवणीत कायमचा कोरला जाईल यात शंका नाही!

Ashiti Joil
यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।
