जीवनातला तोल साधणं जितकं अवघड, तितकंच या खेळातला तोल राखणं कठीण. स्लॅकलायनिंग हा केवळ खेळ नाही, तर आत्मविश्वास, संयम आणि धैर्य यांची खरी परीक्षा आहे. प्रत्येक पावलागणिक मन स्थिर होतं, आणि भीतीच्या जागी येतो आत्मविश्वासाचा प्रकाश!

"तारेवरची कसरत" हा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. आपण फारफार तर डोंबाऱ्याच्या खेळात ही कसरत पाहिलेली असते... पण कल्पना करा मित्रांनो खरंच अशी कसरत करायची वेळ आपल्यावर आली तर ... अ‍ॅडव्हेंचर प्रेमींच्या बाबत हे अगदीच शक्य आहे बरं!

नमस्कार मित्रांनो! आतापर्यंतच्या “अ‍ॅडव्हेंचर अड्डा”च्या लेखांमध्ये आपण वेगवेगळे रोमांचक खेळ पाहिले. त्यात आकाशातले, जमिनीवरचे, पाण्यातले, बर्फातले असे विविध खेळ अनुभवले. काही ग्रुपने खेळले जाणारे, काही एकट्याने करायचे, काही अगदी अति-साहसी प्रकारात मोडणारे!


आज आपण जाणून घेणार आहोत स्लॅकलायनिंग बद्दल…


स्लॅकलायनिंग म्हणजे नेमकं काय ?

दोन झाडांच्या किंवा खांबांच्या मधे एक पातळ पट्टी बांधली जाते, आणि त्या पट्टीवर चालायचं असतं. कोणत्याही आधाराशिवाय! आणि त्यात भर म्हणून ही पट्टी असते इलास्टीकची! जी चालताना हलते, डुलते, थरथरते. या पट्टीवरून चालणे म्हणजे आव्हानच!

1980च्या दशकात अमेरिकेतील काही गिर्यारोहक क्लाइंबिंग रोपवर चालण्याचा सराव करत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा तर मजेशीर प्रकार आहे आणि अशा प्रकारे जन्म झाला स्लॅकलायनिंगचा.

या स्लॅकलायनिंगचे विविध प्रकार आहेत. ट्रिकलायनिंग (बॅलन्स करताना उड्या मारणे), हायलायनिंग (उंच कड्यावरून बॅलन्स करणे), वॉटरलायनिंग(पाण्यावरून चालणं), आणि योगा स्लॅकलायनिंग ( चक्क योगासनं करताना बॅलन्स करणे)

असं हे स्लॅकलायनिंग करताना पहिल्या पावलावर शरीर थरथरत, पोटात गोळा येतो पण यात शरीराच्या तोलापेक्षाही महत्वाचं आहे मनाचा तोल सावरणं. मनाचा तोल एकदा सावरला की प्रत्येक पावलागणिक स्वतःवरचा विश्वास वाढत जातो आणि जणू पुर्ण कायनात तुम्हाला स्लॅकलायनिंगला मदत करते.

आपल्या भारतामध्येही हा खेळ हळूहळू लोकप्रिय होत आहे. ऋषिकेश, मनाली, गोवा, पुणे, बंगलोरमधल्या अनेक अ‍ॅडव्हेंचर क्लबमध्ये या खेळाने विशेष जागा पटकावली आहे.


स्लॅकलायनिंग जरी रोमांचक असलं तरी योग्य तयारी आवश्यक आहे –

  • नेहमी सुरक्षित ठिकाणी प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच सराव करा.
  • सुरुवातीला कमी उंचीवरूनच सुरू करा.
  • हवामान आर्द्र, वारा जास्त असेल तर टाळा.
  • प्रशिक्षकाच्या सूचना काटेकोरपणे पाळा.

वर्क लाईफ बॅलन्स साधता साधता तरुणाई हाही बॅलन्स उत्तमपणे साधताना दिसते. काय मग तुम्ही कधी निघताय ही कसरत करायला?




Updated On 9 Nov 2025 11:12 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story