'नौकानयन' म्हणजे समुद्राशी, वाऱ्याशी साधलेला रोमांचक संवाद
आपल्याभोवतीचा अथांग निळा सागर फक्त पाण्याचा साठा नाही, तर तो आहे रोमांच, स्वातंत्र्य आणि शांततेचं प्रतीक. लाटांशी खेळत, वाऱ्याच्या जोरावर क्षितिजाकडे झेपावणं – ही अनुभूती म्हणजेच सेलिंग! हा खेळ केवळ नौका चालवण्यापुरता मर्यादित नसून, तो आहे समुद्राशी आणि वाऱ्याशी संवाद साधण्याचं एक अद्भुत माध्यम. प्रत्येक तुषार, प्रत्येक वाऱ्याची झुळूक आणि प्रत्येक क्षण आपल्याला स्वतःशी जोडून ठेवतो. चला तर मग, जाणून घेऊ या या समुद्राच्या साहसाची, आत्मविश्वासाची आणि स्वातंत्र्याची कहाणी सेलिंगची!

- विनश्री राणे .
आपली पृथ्वी ही ३० टक्के भूभागाने वेढलेली आहे आणि ७० टक्के अथांग निळ्या सागराने व्यापलेली आहे. ह्या निळ्या दोस्ताच्या साथीने माणसाने प्रवास केला, व्यापार केला, जगभ्रमंतीही केली.. त्याच निळ्या दोस्ताच्या कुशीत, वाऱ्याच्या मदतीने, क्षितिजाच्या दिशेने झेपावणे ... ही कल्पनाच किती रोमांचक आहे नाही का? हा रोमांच आपल्याला अनुभवता येतो सेलिंग करताना.
हा केवळ बोट चालवण्याचा साधासुधा अनुभव नव्हे तर हा आहे समुद्राशी, वाऱ्याशी थेट साधलेला संवाद. सेलिंगमध्ये आधी हळूहळू नौका पाण्यात सोडली जाते आणि त्यानंतर तिचं शीड उघडल जातं… दुसऱ्या टोकावर नौका चालवणारा असतो आणि तो दोरखंडाच्या साहाय्याने नौकेला योग्य दिशा दाखवत असतो.
वाऱ्याची दिशा वाचून, लाटांचा अंदाज घेऊन, योग्य वेळी शिडाला वळण देणं - हे कौशल्य एखाद्या नृत्यकाराच्या पदलालित्यापेक्षा कमी नाही बरं का! वाऱ्याच्या बळावर समुद्राला कापत नौका जेव्हा पुढे पुढे जाते, तेव्हा अंगावर येणारा प्रत्येक तुषार एक आगळा वेगळा अनुभव देऊन जातो.
सेलिंग आपल्याला ‘इथे आणि आत्ता’ जगायला शिकवते. क्षणात बदलणारी हवामानाची स्थिती, क्षणाक्षणाला घ्यावे लागणारे निर्णय आणि प्रत्येक क्षणी जहाजाचा समतोल राखण्याची जबाबदारी, यातून आपले आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण अधिक विकसित होतात. हा खेळ आपल्याला शिकवतो की, जीवनातही अडचणींचे वादळ आले तरी, योग्य शिड लावून आपण त्यातून यशस्वीपणे मार्ग काढू शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात सेलिंगसारखी क्रीडा मनाला नवचैतन्य देते.
आपल्या ७,५०० किमी पेक्षा अधिक लांबीच्या समुद्रकिनाऱ्यांमुळे भारताला सेलिंगसाठी एक उत्कृष्ट पार्श्वभूमी मिळाली आहे. मुंबई, गोवा किंवा कोची येथील सागरी किनारे या साहसी खेळासाठी प्रशिक्षण केंद्रे बनत आहेत. येथे प्रशिक्षण घेऊन अनेक तरुण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा खेळ तुम्ही एकटे किंवा आपल्या गँग सोबतही ट्राय करू शकता. मग कधी निघताय सेलिंग करायला ?

Ashiti Joil
यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।
