मित्रांनो, साहसाची खरी मजा घ्यायची असेल तर एकदा हॉट एअर बलूनिंग नक्की करून बघा. आकाशात शेकडो फूट उंचीवर तरंगत असताना मिळणारा अनुभव रोमांचक तर आहेच, पण त्यातली शांतता मनालाही मोहित करते. जगभरातील अनेक देशांमध्ये या खेळाचे फेस्टिव्हल्स होतात आणि आता आपल्या भारतातही राजस्थान, लोणावळा, गोवा, मध्यप्रदेश अशा ठिकाणी याचा आनंद घेता येतो. चला तर मग, पक्ष्यासारखे उडण्याची ही स्वप्नवत सफर करूया…!



विनाश्री राणे .


मी सहज आकाशाकडे बघत होते. अचानक काहीतरी रंगीबेरंगी हळूहळू पुढे जाताना दिसलं. मी नीट दिसावं म्हणून डोळे बारीक करून बघितलं. तो पक्षी नव्हता. तो होता हॉट एअर बलून. माणसाने पक्ष्यासारखं उडता यावं म्हणून केलेल्या अनेक प्रयत्नांपैकी एक. मित्रांनो आजपर्यंत एडवेंचर अड्डा या सदरामध्ये आपण अनेक खेळांविषयी जाणून घेतलं. त्यातले काही जमिनीवर, काही हवेत, काही पाण्यात तर अगदी बर्फात खेळले जाणारे खेळही पहिले. आज आपण जाणून घेणार आहोत ते हॉट एअर बलुनिंग बद्दल. खरंतर ह्याला खेळापेक्षा साहसी क्रिया म्हणूनच जास्त पाहिले जाते.

शेकडो फूट उंचीवर बास्केटमध्ये अधांतरी तरंगण्याचा हा सुंदर अनुभव रोमांचकही आहे आणि शांततापूर्णही. काही वेळासाठी आपण पक्ष्याच्या जन्माला आलो की काय असं वाटू लागतं. जमिनीला मागे सोडून वर आकाशाच्या दिशेने जीवाला वाटणारी एक वेगळ्याच प्रकारची हूरहूर, दुसऱ्याच क्षणी आपण निळ्या आकाशात सुखद विहार करणार आहोत हे लक्षात आल्यावर होणारा आनंद, उत्साह ह्यामुळेच असेल कदाचित हॉट एअर बलूनिंगला एक अनोखा साहसी खेळ मानलं गेलं असावं.



हॉट एअर बलूनिंगचा इतिहासही रोचक आहे. १७८३ मध्ये फ्रान्समध्ये मॉन्टगोल्फिए बंधूंनी पहिला बलून उडवला. बरं का मित्रांनो! गंमतीची गोष्ट अशी की या पहिल्यावहिल्या बलूनचे पहिले प्रवासी हे काही त्याचे निर्माते किंवा इतर कोणीही नव्हतं तर ते प्रवासी होते चारपायाचे काही प्राणी.

आज या शोधाने जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे. इतकंच नव्हे तर अनेक देशांमध्ये याचे भव्य फेस्टिव्हल्स होतात. जसे की अमेरिकेतील अल्बुकर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा, तुर्कस्तानातील कॅपाडोकिया बलून फेस्टिव्हल, इंग्लंडमधील ब्रिस्टल इंटरनॅशनल बलून फिएस्टा आणि आपल्या भारतातील पुष्कर इंटरनॅशनल बलून फेस्टिव्हल. रंगीबेरंगी आणि विविध आकारांचे बलून्स आकाशात झेपावताना पाहणं ही स्वतःतच एक पर्वणी असते.




यामध्ये बलून योग्य प्रकारे हाताळणं, जमिनीवर उतरवणं आणि हवेत असताना उंची, इतर अडथळे लक्षात घेणं हे कठीण असतं. त्यामुळे यात आपल्यासोबत एक प्रशिक्षित व्यक्ती असणे गरजेचे असते. इतर साहसी खेळांप्रमाणे यात फार अशी बंधने नाहीत.ज्यांना उंचीची भीती वाटते अश्यांनी फक्त हे करण्याआधी एकदा विचार करावा.बाकी कोणीही ह्या खेळाचा आनंद घेऊ शकत. ह्यासाठी काही तुम्हाला अमेरिका किंवा तुर्कस्तानलाचं जायला हवं असं काही नाही. आपल्या भारतात राजस्थान, लोणावळा, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथेही हॉट एअर बलूनिंग करू शकता. मग मित्रांनो कधी जाऊया हा अविस्मरणीय अनुभव घ्यायला.



Updated On 9 Oct 2025 7:53 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story